बांधकाम मंत्र्यांच्या उपस्थितीत हरिभाऊंनी काँग्रेसला पाडले खिंडार, कल्याण काळेंना गावातच शह

Foto

औरंगाबाद – फुलंब्री मतदारसंघातील रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात हरिभाऊ बागडे यांनी काँग्रेसला खिंडार पाडत चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचे बांधकाम पक्के केले आहे. माजी आमदार आणि काँग्रेस नेते डॉ. कल्याण काळे यांच्या गावातील काँग्रेसचा बागडेंनी सुपडा साफ करण्याचा प्रयत्न केला आहे. पिसादेवी गावातील सरपंच, उपसरपंचासह जिल्हा परिषद सभासदाने सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

 

फुलंब्रीत अंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्याचे आश्वासन

विधानसभा अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचा मतदारसंघ फुलंब्रीमध्ये ७३.४० कोटी रुपयांच्या रस्त्यांचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन झाले. यावेळी पाटील यांनी फुलंब्रीमध्ये अंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते तयार होतील असे आश्वासन दिले. राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळत असल्याचे पाटील यांनी सांगितले. केवळ रस्ते तयार करण्याचेच काम नाही, तर हे रस्ते चांगल्या स्थितीत कसे राहातील याचीही दक्षता घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले. दोन वर्षांनंतर पावसाळ्यातही तुम्हाला रस्त्यांवर खड्डे दिसणार नाही, असा दावा बांधकाम मंत्र्यांनी केला.

 

कल्याण काळेंच्या गावातच बागडेंनी काँग्रेसला पाडले खिंडार

काँग्रेस नेते आणि माजी आमदार कल्याण काळे यांच्या पिसादेवी गावातील सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणूक काही महिन्यांवर आली असताना काळे यांना त्यांच्या गावातच हरिभाऊ बागडेंनी शह दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. पिसादेवीचे उपसरपंच भाऊसाहेब काळे, अजिनाथ धामणे, पाळशीच्या माजी जिल्हापरिषद सदस्य अलका पळसकर, आत्माराम पळसकर, गणेश पळसकर, औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी वाघ यांनी भाजपचे उपरणे खांद्यावर घेत पक्षात प्रवेश केला. डॉ. काळे यांना त्यांच्या गावापासूनच धक्के देण्यास सुरुवात करुन बागडे यांनी आगामी निवडणुकीची तयारीच सुरु केली असल्याचे बोलले जात आहे.